ऑक्टोबर एंड आणि इतर

ह्या ब्लॉगचे शीर्षक खरे तर एम टी आयवा मारू आणि इतर असे असायला हवे होते. तुम्हाला कळाले असेलच आता ह्या ब्लॉगचा काय विषय आहे ते. बरोबर-अनंत सामंत यांच्या कादंबऱ्या. या दोन्ही अनंत सामंत यांच्या कादंबऱ्या आहेत. त्यांनी इतरही काही पुस्तके लिहिली आहेत. एम टी आयवा मारू अर्थात सर्वात अधिक प्रसिद्ध. तिच्या बद्दल बरेच ठिकाणी लिहून आले आहे. मीही ती कादंबरी काही वर्षांपूर्वी वाचली होती. संपेपर्यंत खाली ठेववतच नाही. ऑक्टोबर एंड हे पुस्तक इतक्यातच वाचले. त्याबद्दल लिहावे म्हणून हा ब्लॉग आणि त्याचे शीर्षक!

अच्युत गोडबोले यांच्या पाश्चात्य चित्रकारांच्या जीवनावरचे एक नवीन पुस्तक आले आहे, त्याचे नाव-कॅनव्हास. त्यात त्यांनी मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी आणि त्याच्या आसपास परिसराचे वर्णन आहे, आणि ओघाने ऑक्टोबर एंड या पुस्तकाचा त्यात उल्लेख आहे. आपणही तो परिसर पहिलेला असतो, जहांगीर मध्ये गेलो असतो, तेथील रस्त्यावरून हिंडलेलो असतो. मीही तेथे गेलो आहे. नुकतेच असे वाचले की संगीताचा अड्डा म्हणून प्रसिद्ध असलेले ऱ्हिदम हाउस आता बंद पडले आहे. तसेच इतर जुनी हॉटेल्स देखील बंद पडली आहेत. ही सर्व ठिकाणे त्या त्या काळाची साक्ष देणारी असतात, आणि एक एक करून काळाच्या पडद्यामागे गेली की फक्त आठवणी राहतात. एकूणच इतिहासाचा विद्यार्थी म्हणून यासर्वाबद्दल मला जिव्हाळा आहे, त्यामुळे मी हे पुस्तक शोधले आणि वाचले.

अनंत सामंत हे मुळचे खलाशी, म्हणजे मर्चंट नेव्ही त्यांचे कार्यक्षेत्र, त्याआधी केटरिंग कॉलेज मध्ये शिकलेले. एम टी आयवा मारू, आणि अजून एक दुसरी कादंबरी ‘ त्रिमाकासी मादाम!’ ह्या दोन्ही याच क्षेत्राशी निगडीत आहे. पण  ऑक्टोबर एंड वेगळ्याच क्षेत्राशी निगडीत आहे. कला क्षेत्र आणि केटरिंग क्षेत्र. त्यातही मुंबईतील कला क्षेत्र, जहांगीर आर्ट गॅलरी, त्यामागचे प्रसिद्ध असे समोवार हॉटेल आणि आसपासचा भाग, कुलाबा भाग, येथे अर्धे अधिक कथानक घडते, आणि तेही ऑक्टोबरच्या शेवटल्या ५ दिवसात. म्हणून ‘ऑक्टोबर एंड’ हे शीर्षक. ही कथा आहे कॉलेजच्या मधील ५-६ मित्र आणि मैत्रिणींची, जे काही वर्षानंतर एकत्र भेटतात. कादंबरीचा नायक विशाल हा वेगळ्याच मुशीतून आला आहे. त्याने कॉलेज मधूनच सोडून देवून त्याला आवडते असे क्षेत्र जे चित्रकला, आणि शिल्पकलेशी निगडीत आहे, ते त्याने निवडले असते. तो अतिशय मनस्वी, आणि जीवनाशी प्रामाणिक असणारा, कलावंत आहे. तो मुळचा कोकणातील, मुरुडचा. सामंतांच्या पुस्तकात स्त्री-पुरुष संबंधामध्ये मोकळेपणा असतो, तसे ह्यात ही आहे. सर्वसाधारण पणे कलाकारांचे जीवन जर पाहू गेलो तर, बऱ्याचदा ते वादळी, चढ-उतार असलेले, समाजाचे नियम तोडून देवून जीवन जगणारे असे ते असते.

कादंबरी १९९९ मध्ये प्रकाशित झाली आहे. पण कथानकात १९९५-९६ च्या आसपासचे संदर्भ, तेही मुंबईतील, येतात. उदा. मायकेल जॅक्सन मुंबईत येवून कार्यक्रम ती घटना, १९९३ मधील मुंबई साखळी बॉम्बस्फोट, आर्थिक उदारीकरण नुकतेच सुरु झाले आहे त्याचे संदर्भ. नायक विशाल हा कलाकार असल्यामुळे, त्या क्षेत्रातील सविस्तर माहिती येते. एखादे मातीचे शिल्प तयार करण्याची पद्धत, त्यातील वेग-वेगळे बारकावे, असे सर्व त्यांनी नीट मांडले आहेत, त्यातून सामंतांचा अभ्यास दिसतो. ऑक्टोबरच्या शेवटच्या दिवशी एक अतर्क्य घटना घडते आणि वेगळेच वळण मिळते. ते समजण्यासाठी ही कादंबरी वाचायला हवी. छोटीशीच आहे ती. पण मला ती भावली त्यातील भारतीय कलाकाराच्या जीवनाचे प्रातिनिधिक चित्रणामुळे, मुंबईच्या कला-जीवनाचे जे वर्णन आहे त्यामुळे. गेले काही वर्षे मला त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. सतीश नाईक यांच्या ‘चिन्ह’ ह्या वार्षिक अंकांमुळे, कलाकारांच्या जीवनावरील पुस्तकांमुळे, लेखांमुळे(उदा. प्रभाकर बर्वे यांचे कोरा कॅनव्हास, सुहास बहुलकर यांचे बॉम्बे स्कूलच्या आठवणी, तसेच गायतोंडे यांचे सतीश नाईक यांनी प्रसिद्ध केली चरित्र, जी ए कुलकर्णी यांच्या पत्रातून भेटणारे जे जे स्कूल ऑफ आर्टचे संभाजी कदम, केकी मूस यांच्यावरील लेख), ह्या क्षेत्रात भारतात गेल्या ८०-९० वर्षात, काय झाले, तेही मुख्यता: मुंबई कला क्षेत्रात, हे वाचणे, समजणे, अतिशय रोचक आहे. त्याबद्दल लिहायचे आहे, पण परत कधीतरी.