नटसम्राट

जानेवारीच्या पहिल्या तारखेलाच प्रदर्शित झालेला नाना पाटेकरचा ‘नटसम्राट’ आम्ही आज हिंजवडीमधील नवीन मल्टीप्लेक्स मध्ये पहिला. पिंपळे सौदागरचे सिटीप्राईड कधी सुरु होणार कोणास ठाऊक. हिंजवडीमधील Xion E-Square मध्ये पहिल्यांदाच गेलो. तेथील आसनव्यवस्था खुपच छान आहे. मुख्य चित्रपटगृह ज्या ठिकाणी आहे, तेथे काही मोठाले पोस्टर्स त्यांनी लावले आहेत. त्यावर १९५०च्या दशकापासून ते २००० पर्यंतच्या काही चित्रपटांची चित्रे-हिंदी, इंग्रजी अशी दोन्ही लावली आहेत. चित्रपट सृष्टीचा एक धावता पण मनोरंजक आढावा घेता येतो. काही चित्रपटातील प्रसिद्ध संवादही त्यांनी लावली आहेत.

20160110_141804

नाना पाटेकर in and as नटसम्राटबद्दल काय बोलावे? त्याचा अभिनय, संवादफेक हे सर्व अगदी भारावून टाकते. विक्रम गोखले, मृण्मयी देशपांडे यांचाही अभिनय उत्तम. कथा तर अगदी प्रसिद्धच आहे. गतकाळातील रंगमंचावरील एक प्रसिद्ध नट, एका धुंदीत निवृत्त झाल्यावर आपली सर्व मालमत्ता मुलांत वाटून टाकतो. एका घटनेमुळे मुलाच्या घरातून बाहेर पडतो, आणि दुसऱ्या एका घटनेमुळे हा अभिमानी नट मुलीच्याही घरातून बाहेर पडतो. आणि त्याची परवड सुरु होते, आणि शेवटी करूण अंत होतो. ह्या चित्रपटामुळे ज्येष्ठ नागरिक, तरुण पिढी यांचे संबंध या सारखा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे, पण तो काही त्याचा मूळ गाभा नाही. मूळ विषय तो नट, आणि त्याचा भूतकाळ, त्याचे वैभव, अहंकार, आणि त्याचे त्या काळात जगणे.

वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे हे अजरामर नाटक. मी पूर्वी श्रीराम लागू यांनी केलेला ‘नटसम्राट’ रंगमंचावर पहिला होता. मूळ नाटकातील मुलाच्या घरातील घटना आता मला आठवत नाही, पण चित्रपटात ही घटना, नातीला शिव्या शिकवणे असे आहे, ते जरा अतीच झाले असे मला वाटते. नानाच्या एकूण व्यक्तिमत्वाला ते असेलही, हशा देखील पिकतो. पण ते तसे नसते तर बरे झाले असते. चित्रपटाचे climax सुप्रसिद्ध ‘घर देता का घर, एका तुफानाला’ ह्या संवादाने होते, ते अतिशय परिणामकारक आहे. नानाच्या अभिनयाबरोबर, मूळ नाट्य-संहितेतील परिणामकारक संवाद हेच चित्रपटाचे बलस्थान आहे. नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांच्या अभिनयातील जुगलबंदी देखील सुखद आहे. घरातील प्रसंगांचे चित्रीकरण भोर, भाटघर परिसरातील मधील सरकारी विश्रामगृहात झाले आहे. ती घरे म्हणून खुपच मोठी वाटतात. एखाद्या प्रसिद्ध नटाने, निवृत्त झाल्यावर देखील त्याच धुंदीत, मस्तीत वागावे, जगावे, वास्तवतेपासून फारकत मनस्वी जगणे जगावे, ही मनाची अवस्था काय आहे, उन्माद आहे की कल्पनारम्यता आहे का, याचा मानसशास्त्रीयदृष्ट्या विचार करायला हवा.

इतक्याच प्रसिद्ध नाटकावर बेतलेला ‘कट्यार काळजात घुसली’ हा चित्रपट आला होता. आणि आता हा ‘नटसम्राट’. दोन्ही माध्यमान्तराचे प्रयोग खुपच यशस्वी झाले. आता अश्या चित्रपटांची लाट येते की काय असे वाटू लागले आहे. एकूण काय, ‘कट्यार काळजात घुसली’ मुळे नवीन पिढी मध्ये संगीताची गोडी वाढतेय, तर ‘नटसम्राट’ मुळे, त्यातील मराठीमुळे, मराठी साहित्य, कुसुमाग्रज, आणि इतर दिग्गजांकडे त्यांचे लक्ष जावे, अशी अपेक्षा पिंपरी चिंचवड मधील मराठी साहित्य संमेलन तोंडावर आले असताना करायला हरकत नाही. मी असे ऐकले ही ह्या चित्रपटाच्या तिकिटातून आलेल्या काही उत्पन्नापैकी काही भाग त्याच्या ‘नाम फौंडेशन’ला दिले जाणार आहे.

Leave a comment