वसंतोत्सव विमर्श

गेल्या वर्षी पासून पुण्यातील वसंतोत्सव ह्या संगीत महोत्सवाच्याच्या अंतर्गत वसंतोत्सव विमर्श नावाचा संगीतविषयक एक दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात येवू लागले आहे. त्याबद्दल मी येथे लिहिले होते. माझ्या सुदैवाने ह्या वर्षीदेखील मला त्यात उपस्थित राहायला जमले. ह्या वर्षी दोन व्याख्याने होती. एक पंडित सत्यशील देशपांडे यांचे, आणि दुसरे सुरेश चांदवणकर यांचे. ह्या वर्षीच्या चर्चासत्राबद्दल थोडेसे.

पंडित सत्यशील देशपांडे यांच्या व्याख्यानाचा विषय राग-स्वरूप आणि बंदिश हा होता. सत्यशीलजी यांची मी यापूर्वी देखील २-३ वेळेला lec-dem ऐकले आहे.

20160114_110607

त्यांना गायनाबरोबर संशोधनाचे अंग देखील आहे. विषय, विचार मांडण्याचे कौशल्य आहे. आणि बऱ्याचदा ते अतिशय घरगुती गप्पांसारखे स्वरूप असते. त्यामुळे उद्बोधक असते, तसेच ते क्लिष्ट नसते, तर मनोरंजक असते. त्यांनी वैदिक संगीत, ज्याचे स्वरूप प्रामुख्याने साम गायन होते, त्यापासून अलीकडचे एकल-संगीत, ज्यात कलाकाराला विस्तार करायला, आपली कला दाखवायला वाव असतो, त्यापर्यंत कसा प्रवास झाला, आणि तो जगातील इतर संगीतापेक्षा कसा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे, हे विषद करून सांगितले. विशेषतः पाश्चात्य कला-संगीत, कसे समूह संगीत आहे, आणि त्यात पूर्वनियोजितपणावर किती भर असतो ते सांगितले. तसेच दक्षिण भारतीय संगीत, म्हणजे कर्नाटक शास्त्रीय संगीत, त्यातही, कल्पनाविस्ताराला वाव आहे, पण गेल्या काही दशकात, तो भाग जवळ-जवळ नष्ट झाला आहे, त्याची करणे काय, हे देखील स्पष्ट केले. बंदिशीबद्दलचे त्यांचे विचार, तिचे ३ घटक, आणि बंदिश कसे राग दर्शवतो, पण बंदिश म्हणजे पूर्ण राग कसा नाही हे सप्रयोग दाखवले.

सुरेश चांदवणकर हे प्रसिद्ध ध्वनीमुद्रिका संग्राहक आहेत. त्यांना दोन विषय दिले होते. त्यातील एक music record collection, archiving हा होता-जो त्यांचाच विषय आहे. दुसरा विषय हा संगीतातील विविध प्रकार जे डॉ. अशोक रानडे यांनी कल्पले आहेत त्यावर होता. सुरेशजी आणि रानडेजी दोघे सुहृद होते, रानडेजी यांना archiving बद्दल विशेष आस्था होती, त्यांनीदेखील त्यात काम केले होते. सुरेशजी यांनी संगीतातले प्रकार वेगवेगळी जुनी गाणी ऐकवून, तसेच त्यांनी आणि चैतन्य कुंटे यांनी एकत्र विवेचन करून, तो विषय मांडला. त्यांच्या lec-dem त्यांनी बरीच जुनी, दुर्मिळ गाणी ऐकवली आणि त्यावर गप्पा झाल्या. त्यांनी वसंतराव देशपांडे(आणि फैयाज) यांनी हिंदी चित्रपटात गायलेला टप्पा मृगनयना चंद्रमुखी ऐकवून त्यांनी सुरुवात केली. तो बंगाली बाजाचा टप्पा, त्याला आर. डी. बर्मन यांनी दिलेले संगीत,आणि त्या अनुषंगाने त्याचे रस-ग्रहण यामुळे, चांगली सुरुवात झाली. आदिम संगीत जे २-३ सुरांचे असते, लय नसते; लोकसंगीत ज्याचा भर धून आणि गीत रचना यावर असतो; कलासंगीत जे धुनेपासून रागाकडे जाते, त्याला व्याकरण असते; धर्मसंगीत ज्यात भजन, किंवा इतर धार्मिक गायन असते; जनसंगीत जे साधारणतः लोकप्रिय संगीत, हलके-फुलके असते; आणि सहावा प्रकार, संगम-संगीत, ज्यात विविध प्रकारांचे एकत्रीकरण, संगम असते तसे संगीत.

सुरेशजी यांचा दुसरा विषय होता, record collection, archiving, जो खुपच माहिती पूर्ण होता, आणि त्याची गरज, महत्व, त्यात होणारे एकूण सध्याचे काम, इतिहास देखील त्यांनी मांडला. त्यांनी Society of Indian Record Collectors (SIRC) स्थापन केली आहे, त्याबद्दलही सागितले. Collectors आणि Archivist मधला फरक विषद केला. या विषयामध्ये पदवी तसेच पद्व्योत्तर अभ्यासक्रम सुरु करण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. नव्या पिढीलादेखील ह्या क्षेत्राचे आकर्षण आहे, आणि ती कशी उपयुक्त गोष्ट आहे हे सांगितले. बंगळूरूचे विक्रम संपत यांनी कशी ह्यात उडी मारली आहे त्याबद्दल, तसेच त्याचे My Name is Goharjan हे पुस्तक याबद्दल ते बोलले. माझी आणि सुरेशजी यांची भेट डिसेंबर २०१४ मध्ये माझ्या अमीरबाई कर्नाटकी पुस्तकाच्या मराठी भाषांतराच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मुंबईत झाली होती.

DSCN0217

L to R: myself, Suresh Chandwankar, Rahamat Tarikere

त्या पुस्तकाचे मूळ कन्नड लेखक रहमत तरीकेरी आणि त्यांची ह्या पुस्ताकानिमित्ताने बरीच चर्चा झाली होती तसेच पुस्तकासाठी दुर्मिळ गाणी आणि इतर माहिती गोळा करण्यात मदत देखील झाली होती.

दोघांच्या सत्रामधून मला एक समान धागा सापडला तो म्हणजे documentation ची गरज आणि त्यात होत असलेले काम. पंडित सत्यशील देशपांडे तर प्रसिद्ध गायक तर आहेतच, पण त्या बरोबर, त्यांना documentation चे महत्व पटले आहे आणि ते त्या क्षेत्रातही काम करत आहेत. सुरेशजी तर त्यातलेच आहेत. एकूण ह्या चर्चासत्रामुळे documentation, record collection, archiving सारख्या महत्वाच्या आणि दुर्लक्षित विषयाला स्पर्श करता आला, हे खुपच चांगले झाले. ह्या स्तुत्य उपक्रमाची आणि कार्यक्रमाची जाहिरात आणखी व्हायला पाहिजे. दोन्ही वर्षी अगदी किरकोळ उपस्थिती होती. संगीताचा कान तयार होण्यासाठी असे कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचले पाहिजे.

Leave a comment