विलोभनीय अशी सय

परवा बऱ्याच दिवसातून घराजवळ असलेल्या वाचनालयात जायला मिळाले. पुस्तके चाळत असता, प्रसिद् चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांचे आत्मचरित्र हाती लागले. सई परांजपे हे तसे समांतर चित्रपट चळवळीतील महत्वाचे नाव. खरे तर अभिनेता नसीरुद्दीन शाहचे आत्मचरित्र देखील नुकतेच आले होते(English-Then One Day) आणि आणि त्यांनी त्याचे केलेले मराठी भाषांतर(आणि मग एक दिवस) देखील आले होते. मागील महिन्यातच मी चित्रपट रसास्वाद शिबिराला उपस्थित राहिलो होतो, तेथे त्याचा उल्लेख झालाच होता. त्यामुळे ते नाव तसे डोक्यातच होते. त्यामुळे मी ते पुस्तक लगेच घेतले आणि वाचले. त्याचे शीर्षक सय-माझा कलाप्रवास. सय म्हणजे आठवणी, स्मरणरंजन. हे पुस्तक बरोबर एक वर्षापूर्वी प्रकाशित झाले होते. पुस्तक वाचल्यावर, त्याचे आयुष्य, म्हणजे कला जीवन किती विविध अंगांनी सजले होते, हे समजते. नसीरुद्दीन शाह आणि सई परांजपे तसे साधारण एकाच कालखंडातील. त्याकाळचा इतिहासाचा आणखीन उलगडा होतो. नसीरुद्दीन शाहचे आत्मचरित्र देखील वाचायाले हवे. असो.

सई परांजपे यांचे आजोबा(आईचे वडील) म्हणजे प्रसिद्ध गणिती रँग्लर परांजपे. त्याचे वडील हे रशियन होते. ते चित्रकार होते, त्यांच्या बरोबर औटघटकेचा संसार करून त्यांची आई शकुंतला परांजपे, लहानग्या सई बरोबर पुण्यात येते, येथून आत्मचरित्राची सुरुवात होते. शकुंतला परांजपे, या देखील लेखिका, तसेच सामाजिक कार्यकर्त्या म्हणून काम केले, त्याबद्दल त्या लिहितात. इथेच वाचकाला आश्चर्याचा धक्का बसतो, ही माहिती मला तरी नव्हती. त्यानंतरची प्रकरणे ही सलग एका मागून एक अशी पुणे आकाशवाणी, पुण्यातील बालरंगभूमी, दिल्लीचे National School of Drama, पुण्यातील FTII, दूरदर्शन, Children’s Film Society of India, आणि परत दूरदर्शन, मधील त्यांचे दिवस याबद्दल ते लिहितात. या प्रकरणातून आपल्याला उमजते की त्यांनी किती प्रकारे वेगवेगळी माध्यमांतून प्रवास केला आहे. दूरदर्शनच्या अगदी सुरुवातीच्या दिवसात त्यांनी दिल्लीत, चांगली सात-आठ वर्षे काम केले. तेथे त्यांनी लघुपट, माहितीपट, टेलिफिल्म, टेलीप्ले इत्यादी प्रकार आणले. दूरदर्शन मध्ये असताना प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक बर्ट हान्सट्रा यांची मुलाखत घेतली याची आठवण त्यांनी सांगितली आहेत. बर्ट हान्सट्रा यांची एक फिल्म ग्लास ही मी नुकतीच चित्रपट रसास्वाद शिबिरात पाहिली होती.

IMG_1295

Sai Paranjpe

शेवटील पाच-सहा प्रकरणे ही त्यांनी आपल्या चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन क्षेत्रातील वावराविषयी लिहिले आहे. त्यांनी काही मोजकेच चित्रपट केले, आणि सर्वच्या सर्व हे एखाद्या विषयाला धरून होते, कुठलेही तद्दन व्यावसायिक असे नव्हते. मी अर्थात कथा, चष्मेबद्दूर हे चित्रपट पाहिले आहेत, आणि स्पर्श देखील पाहिल्याचा आठवतो आहे. त्यांचा पहिला चित्रपट स्पर्श. प्रत्येक चित्रपटासाठी एक प्रकरण, आणि ही प्रकरणे म्हणजे त्या त्या चित्रपटाची पडद्यामागची कुळकथाच. स्पर्श, चष्मेबद्दूर, कथा, दिशा, पपीहा, साज हे ते सहा चित्रपट. प्रत्येकाचा विषय वेगळा. त्या त्या विषयाला न्याय देण्यासाठीची धडपड त्यांनी अतिशय आत्मीयतेने मांडली आहे. चित्रपटांची पटकथा तेच लिहीत असत. पपीहा हा चित्रपट चिपको आंदोलनावर आधारित आहे. प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते जगदीश गोडबोले यांनी देखील सह्याद्री साठी बरेच काम केले होते, त्यांनी देखील पुस्तके लिहिली आहेत. त्यांची भेट घेऊन चर्चा केली, इत्यादी संदर्भ त्यांनी दिले आहेत. जगदीश गोडबोले यांच्या कामावर मी पूर्वी एक ब्लॉग(पश्चिम घाट बचाओ) लिहिला होता.

सई परांजपे यांची आणखीन एक प्रमुख ओळख म्हणजे नाट्यसृष्टीतील त्यांची मुशाफिरी. त्यासाठी त्यांनी ह्या आत्मचरित्रात सात-आठ प्रकरणे खर्ची घातली आहेत. प्रसिद्ध अभिनेता अरुण जोगळेकर त्यांचे पती, पुढे दोघे विभक्त झाले. अभिनेत्री विनी परांजपे त्यांची मुलगी. त्यांनी आणि अरुण जोगळेकर यांनी नाट्यद्वयी ही नाट्यसंस्था सुरु केली. ह्या सर्वांच्या कित्येक आठवणी ह्या प्रकरणातून आल्या आहेत. त्यांचे सर्वात प्रसिद्ध नाटक सख्खे शेजारी. ते मी खूप पूर्वी केव्हा तरी दिवाळीत एका दूरचित्रवाणी वाहिनी(त्यांचा शब्द प्रकाशवाहिनी, मस्त आहे ना?) वर पहिले होते. इतर प्रसिद्ध नाटके मोगरा फुलला, नांदा सौख्यभरे, जास्वंदी, आलबेल, आणि इतर नाटकांच्या कुळकथा याबद्दल त्यांनी लिहिले आहे. त्यांची काही नाटके हिंदी, पंजाबी भाषांत देखील त्यांनी केली आहेत, तसेच इतर नाटककारांची जसे की विजय तेंडूलकर यांचे गिधाडे, व्यंकटेश माडगुळकर यांचे बिकट वाट वहिवाट ही त्यांनी हिंदीत केली.

त्यांच्या वयाच्या सव्विसाव्या वर्षी त्यांना युरोपला जाण्याची संधी मिळाली, त्यावेळी त्यांनी आपल्या पित्याची भेट घेतली, सावत्र आई, बहिण यांच्याबरोबर घालवले तेथील दिवस, तसेच तेथील विविध अभ्यासदौरे, तेथील नाटके पाहणे,  इत्यादी बद्दल देखील त्यांनी लिहिले आहे. हे पुस्तक म्हणजे त्यांचे पहिले लेखन नव्हे असे वाचताना आपल्याला समजते. नाटकं तर त्यांनी लिहिले आहेतच, आणि ती प्रकाशित आहेत. पण त्यांनी वेळोवेळी कथा, लघुकथा, ललितलेख देखील लिहिले आहेत. त्यांचा एखादा संग्रह आहे की काय हे शोधले पाहिजे. उदाहरणार्थ, त्यांनी युरोप मधील एका विशिष्ट्य अनुभवाबद्दल जिगोलो ही पुरुष वेश्या ह्या विषयाभोवती एक लघुकथा लिहिली होती असे ते ‘सय’ मध्ये नमूद करतात. पुस्तकाच्या शेवटी वाचकाला ते सुचवतात की अजून त्या आपल्या कला-जीवनाबद्दल, आयुष्याबद्दल लिहिणार आहेत. असे असेल तर ते चांगलेच आहे.

विविध क्षेत्रात, विविध ठिकाणी, विविध भाषेत काम केलेल्या सई परांजपे यांचे समृद्ध कलाजीवन जाणण्यासाठी हे पुस्तकं नक्कीच वाचले पाहिजे. तसेच हे पुस्तक विकत घेऊन संग्रही ठेवावे असे आहे, ते तर मी घेणार आहेच, तसेच नसीरुद्दीन शाहचे पुस्तक देखील घ्यावेसे वाटते आहे. इंग्रजी आवृत्ती ३००-३२५ रुपयात मिळत आहे, मराठी जवळ जवळ ७००! विजया मेहता(त्याही ह्या दोघांच्या समकालीनच) यांचे झिम्मा हे आत्मचरित्र मी विकत घेतले होते, त्यावर देखील लिहायचे आहे, पाहुयात, पुढे मागे.

Leave a comment