Dance of the wind

मी आजारी असल्यामुळे ऑफिसला दांडी मरून घरीच राहिलो होतो. अशा वेळी झोपून झोपून तरी किती झोपणार? लहानपणी आम्ही राहत असलेल्या घरी पावसाच्या पाण्यामुळे भिंतीवरती ओल चढून विविध आकार तयार होत असत. आजारी पडल्यावर, पलंगावर पडल्या पडल्या ते आकार पाहून मनात विविध प्रतिमा तयार होत आणि मनोरंजन होत असे! आता अशी परिस्थिती नव्हती. हाताशी पुस्तकं, किंवा टीव्हीचा रिमोट असतो. त्या दिवशी सकाळी सकाळी टीव्ही लावला, आणि एके ठिकाणी नुकताच सुरु झालेला सिनेमा होता. तो होता हिंदी सिनेमा, आणि त्यात किटू गिडवानी दृष्टीस पडली, पण सिनेमाचे नाव तर इंग्रजी दिसत होते(Dance of the wind) जे वेगळेच होते-Dance of the wind, म्हणजे काय? म्हटले जरा पाहुयात. पण प्रत्यक्षात, तो संपूर्ण पाहून मगच उठलो.

किटू गिडवानीला किती दिवसांनी पहिले होते. हो, तीच ती, दूरदर्शन मालिकांमधून काम करणारी. नंतर खूप अशी तीला सिनेमात पाहिलेले आठवत नाही. गोविंद निहलानी यांच्या रुक्मावती की हवेली मध्ये होती. Dance of the wind समोर चालू होता, काहीतरी गंभीर दृश्य चालू होते. किटू गिडवानीचीच प्रमुख भूमिका होती. ती एक गायिका होती त्यात, तेही तिचा आवाज गमावलेली. ही गायिका(नाव पल्लवी) म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीत गाणारी गायिका. गुरुकडे(जी तिची आईच असते) समोरासमोर बसून गाण्याचे धडे ही गायिका घेते आहे, त्यातील विविध बारकावे घोटून घेणे चालू आहे. आपल्या भारतीय संगीत शिक्षणाचे, तालमीची वैशिष्ट्ये दर्शवाणारी ती दृश्ये. गुरु आपल्या शिष्याला मृत्यू जवळ आल्याची, चाहूल झाल्याची सूचना देते. एका जाहीर संगीत कार्यक्रमात, गाणे सुरु करण्यापूर्वी जे काही क्षण असतात, ते छान दाखवले आहे. पण तेथे गायिकेचा आवाज लागत नाही, कारण, आपल्याला असे समजते की गुरूच्या मृत्यूमुळे भावविवश झाल्यामुळे असे झाले असावे.

IMG_1292

Kitu Gidwani, Dance of the Wind

k

Kitu Gidwani, Dance of the Wind

पुढे काही कारणाने, तिचा आवाज पूर्णपणे जातो, कारकीर्द उध्वस्त होते-गाता येत नाही, गाणे शिकवता येत नाही. मानसिक रित्या खच्चीकरण होते, तिची तळमळ, हा सगळं प्रवास किटू गिडवानीने छान रंगवला आहे. ओघाने येणारी गाणी, विविध धून, प्रसंगानुरूप हे सर्व एक छान दृक्‌श्राव्य अनुभूती देतात. ह्या गायिकेला आपला आवाज परत गवसतो हे नंतरच्या ६०-७० मिनिटात उलगडते. चित्रपटाला एक अध्यात्माची, दैवी चमत्काराची किनार आहे. शास्त्रीय संगीत आणि अध्यात्म यांचा घनिष्ट संबंध आहे, हे मान्य. पण चित्रपटात येणारी लहान मुलगी, तारा, आणि तिचे गाणे, तिचा वावर हे का आणि कसे सांगता येत नाही. ही गायिका आपल्या आईच्या गुरुकडे, जे अर्थात अतिशय वयोवृद्ध असतात, त्यांचा शोध घेत त्यांना भेटते. त्यांचा देखील आवाज नसतो. पालवीची त्यांच्याकडून गंडा बांधून घेऊन शिकण्याची इच्छा ते धुडकावून लावतात. पण त्यांच्या आणि त्या लहानग्या मुलीच्या सान्निध्यात तीला आपला हरवलेला आवाज गवसतो अशी ही कथा आहे. तर सकाळी सकाळी हा असा शास्त्रीय गाण्यांच्या धुनानी भरपूर, असा, अध्यात्मिक अनुभव देणारा, आणि बऱ्याच वर्षांनी किटू गिडवानीला पाहिल्यामुळे, एकदम मस्त वाटले. इतक्यातच जुन्या काळातील प्रसिद्ध गायिका गिरिजा देवी यांचे निधन झाले, त्यामुळे मौखिक गुरु-शिष्य परंपरेने शिकलेल्या, शिकवण्याऱ्या त्या होत्या. शेवटी Dance of the wind या नावाबद्दल. काय असावा अर्थ याचा? मला वाटते, की बागडणारा वारा, जसा स्वछंदी असतो, आणि त्यामुळेच त्याचे गाणे होते, असा तर संदेश द्यायचा नसावा? इंटरनेट वर या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची(राजन खोसा) एक साईट आहे, त्यात त्यांनी ह्या चित्रपटाची पडद्यामागची कहाणी नमूद केली आहे. ती छान आहे वाचायला. त्यात त्यांनी लिहिले आहे, की शुभा मुदगल यांना ह्या चित्रपटाच्या कथेत आपली स्वतःची कहाणी दिसली.

असो. बराच जुना, म्हणजे, १९९७ मधील हा सिनेमा आहे. प्रसिद्ध गायिका शुभा मुदगल यांचे पार्श्वसंगीत आहे. हा बहुतेक पाश्चिमात्य देशातील लोकांसाठी बनवला गेला असलेला सिनेमा असला पाहिजे. चित्रपटाच्या शेवटी येणाऱ्या श्रेयनामावलीतून समजते की जर्मन संस्था, भारतातील NFDC, आणि इतर काही संस्थांनी मिळून हा सिनेमा बनवला आहे. शास्त्रीय संगीत परंपरेवर हिंदी आणि इतर भारतीय भाषेत तसे बरेच सिनेमे आहेत. हा थोडासा वेगळाच म्हटला पाहिजे. मध्यंतरी मी माझ्या एका मित्राने एक लघुपट बनवला होता, त्याचा विषय सुद्धा गाणे हाच होता, एका वृद्धाच्या जीवनात एकाकी पण आल्यामुळे, जीवन संपवण्याचा निर्णय तो बदलतो, का तर, त्याचे गाणे ऐकून रस्त्यावरील एक लहानगी त्याच्या पित्याबरोबर गाणे शिकायला येते. त्याबद्दल मी लिहिन कधीतरी.

 

 

Leave a comment