Boston Tea Party

मी अमेरिकेतील बोस्टन या ऐतिहासिक तसेच अत्याधुनिक शहराला भेट देऊन आलो. त्यावेळेस भटकंती दरम्यान बोस्टन टी पार्टी(Boston Tea Party) या नावाने प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिनारी असलेल्या अनोख्या संग्रहालयाला भेट देण्याचा योग आला. त्याबद्दल आज थोडेसे लिहिण्याचा मानस आहे.

बोस्टन टी पार्टी हा विषय शाळेत असताना इतिहासात अभ्यासलेला असतो. त्यावेळेस असे कधी वाटले नव्हते की या घटनेचे जतन केलेल्या संग्रहालयाला भेट देऊन याच देही याच डोळा ते पाहता येईल. तो इतिहास थोडक्यात इथे सांगणे आवश्यक आहे, पुढचे कथन करण्याच्या अगोदर. ही खरे तर अमेरिकेच्या इतिहासातील अतिशय महत्वाची घटना, जी डिसेंबर १६, १७७३ रोजी बोस्टनच्या बंदरात घडली. ब्रिटीश संसदेने अमेरिकेतील वसाहतींच्या हक्कांवर गदा आणली होती. त्याचा निषेध म्हणून विविध आंदोलने, विरोधी गोष्टी अमेरिकेतील तेरा वसाहतींमध्ये होत होत्या. ब्रिटनवरून ईस्ट इंडिया कंपनी मार्फत अमेरिकेतील वसाहतींना चहा निर्यात होत असे. हा करयुक्त महाग चहा त्यांना नको होता, त्यांना आपला चहा थेट चीनमधून आयात करण्याचा हक्क हवा होता. ह्या आणि इतर मागण्यांच्या साठी होणाऱ्या आंदोलनाचा भाग म्हणून बोस्टनच्या स्वातंत्र्यप्रेमी नागरिकांनी त्या दिवशी बंदरात आलेल्या बोटींवरील चहाची खोकी समुद्रात बुडवून निषेध व्यक्त केला. त्यांनी मूळ राहीवासी इंडियन लोकांच्या सारखा वेश परिधान करून ही गनिमी कावा वापरून कारवाई केली. ह्या सर्वांची परिणीती पुढे प्रखर विरोध, आणि शेवटी युद्ध होऊन अमेरिका देश जन्मास आला.

मी गेलो त्या दिवशी, जानेवारीतील अतिशय थंड आणि जोरदार वारा होता. नुकताच बॉम्ब सायक्लोन येऊन वाताहत करून गेला होता. पण थोडेफार कोवळे उन मात्र दिवसभर होते. तेवढाच दिलासा. हे संग्रहालय समुद्र किनारीच आहे. बोस्टन शहर अटलांटिक महासागराच्या Massachusetts Bay जवळ वसलेले आहे. ह्याचा नजरा संग्रहालयाजवळून अतिशय विहंगम दिसतो. तिकीट काढून संग्रहालयाच्या दाराशी पोहचलो तर तेथे जुन्या काळातील वेश(१७व्या, १८व्या शतकातील colonial लोकांचा) परिधान करून काही स्त्रिया, पुरुष उभे होते. त्यांनी स्वागत केले. आणि हातात एका पक्ष्याचे लांबूडके असे पीस दिले आणि आतील दालनात(The Meeting House) बसवले. ते पीस डोक्याला लावायचे, कारण पर्यटकांना मूळ रहिवासी इंडियन यांच्या सारखा वेशभूषा करायची होती. त्यांनी एकूण कार्यक्रम सांगितला. पर्यटकांना बोस्टन टी पार्टीचा खराखुरा अनुभव देण्यासाठी पहिला भाग असा होता की Samuel Adams सारख्या नेते मंडळींची भूमिका करणाऱ्यांची भाषणे, जनतेला(म्हणजे आम्हा पर्यटकांना) आव्हान असा होता. यात पर्यटकांना सहभागी घेऊन, त्यांना घोषणा वगैरे देण्यास सांगून, आत मध्ये बोटीवर नेले गेले. त्यांची लोकंही होती आमच्याबरोबर. बोटीवर चहाची मोठमोठी गाठोडी(अर्थात लुटूपुटूची) ठेवलेली होती. पर्यटकांना ती गाठोडी समुद्रात बुडवून त्याचा अनुभव घेण्यास सांगितले. हे सर्व अतिशय छान आणि अगदी वेगळाच असा अनुभव होता. ती बोट ही त्याकाळची सजावट असलेली होती. पर्यटकांना त्या काळात नेण्याचा तो प्रयत्न होता(ज्याला immersive experience असे म्हणतात). तेथे दोन बोटी आहेत, Beaver आणि Elanor या नावाच्या, ज्या त्या वेळच्या बोटीसारख्या आहेत.

त्यानंतर बोटीवरून किनाऱ्यावर(Griffin’s Wharf) परत आल्यावर, एका दालनात नेले गेले. तेथे तर आणखीनच वेगळा अनुभव. पर्यटकांना काहीतरी वेगळे देण्याची, कल्पकतेची ह्या अमेरिकनांची हातोटी वाखाणण्याजोगी जोगी आहे. तेथे holographic projection technology वापरून colonial वेश परिधान केलेल्या दोन स्त्रिया(खऱ्याखुऱ्या नव्हेत!); ज्यातील एक वसाहतवादी(loyal), दुसरी वसाहतविरोधी(patriot) स्वातंत्र्याची कल्पना काय ह्या वर मनात चाललेले द्वंद ते हावभाव, आणि मागे सुरु असलेले संवाद यावरून ते खरेखुरे वाटावे, अश्या पद्धतीने सादर केले गेले(Reenactment). हे मला इतके भावले, की पुढे मी काही दिवसांत फिलाडेल्फियाला गेल्यावर खरेदीच्या वेळेस याच तंत्रावर आधारित एक खेळणे मला मिळाले, त्याचे नाव Merge Cube(AR/VR holograms), ते मी लगेच घेऊनच टाकले.

दुपारचे १ वाजून गेले होते. भूक लागली होती. थोडी चौकशी केल्यावर समजले की संग्रहालयात एक क्षुधाशांतीगृह(हॉटेल!) होते. त्याचे नाव Abigail Tea Room. तेथे जाऊन पाहतो तो काय, परत तेच colonial वातावरण. आणि तेथील वैशिष्ट्य म्हणजे पाच प्रकारच्या चहाची चव चाखायची सोय. बोस्टन टी पार्टी संग्रहालयात चहा हवाच, नाही का? चहा प्यायला, थोडेफार काहीतरी खाल्ले आणि मोर्चा वळवला तो तेथील souvenir shop कडे. किती प्रकारच्या वस्तू तेथे, त्या घटनेची, काळाची आठवण करून देणाऱ्या कित्येक गोष्टी! अशी ही बोस्टन टी पार्टी संग्रहालयाची भेट, त्या महत्वाच्या घटनेची आठवण करून देणारी, अनोखा अनुभव देणारी!

Leave a comment