राजपुत्राचा विवाह

Painting by Rokni Haerizadeh. See note at the end of the blog.

मे महिन्यातील शनिवारची दुपार. बाहेर रणरणते उन. त्यामुळे सुट्टीचा दिवस असूनही बाहेर जावेसे वाटत नाही. जेवण होऊन सुस्तावलो होतो. काहीतरी वाचावेसे देखील वाटत नव्हते. थोडावेळ रेंगाळून झोपावे असा विचार करत टीव्ही लावला. एके ठिकाणी कर्नाटकतील भाजपाचे येडेरुप्पा मुख्यमंत्री असलेले सरकार दुपारी विश्वासमत अजमावणार होते, त्याबद्दल घमासान चर्चा चालली होती. दुसरीकडे, CNN वर सहज आंतराष्ट्रीय बातम्या पहाव्यात म्हणून गेलो, तर तेथे इंग्लंडच्या राजपुत्राच्या विवाहाचा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण चालू होते. राजपुत्राचा शाही विवाह (The Royal Wedding), किंवा राजघराण्याशी निगडीत गोष्टी कायम आपल्यासारख्या सामान्य जनतेच्या उत्सुकतेचा विषय असतो. त्यातही इंग्लंडच्या राणीने आपल्या भारतावर दीडशे वर्षे राज्य केलेले. आपण त्यांची प्रजा, त्यामुळे हा तसा आपल्या घरचाच कार्यक्रम होता! हे थेट प्रक्षेपण लंडनहून जवळच असलेल्या Windsor Castle मधून होत होता. काही वर्षांपूर्वी इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स भारत भेटीवर आले होते, त्याची किती चर्चा झाली होती.

भारत देश तर राजे, राजवाडे यांसाठी हजारो वर्षांपासून प्रसिद्ध. स्वातंत्र्यापूर्वी भारतात साडे-सहाशेच्यावर संस्थाने होती. कर्नाटकातील मैसूरचे वडीयार राजघराणे(त्यांचा दसरा सोहळा अपूर्व असतो, जो मी प्रत्येक वर्षी पाहतो), तसेच राजस्थानातील राजे, अजूनही आपली परंपरा, संपत्ती, वैभव बाळगून आहेत. त्याबद्दल मी पूर्वी येथे लिहीले आहे. पण इंग्लंडच्या राणीची गोष्टच न्यारी. हजारो वर्षांची सलग परंपरा इंग्लंडच्या राजघराण्याला आहे. आजही, ब्रिटनच्या लोकशाहीच्या काळात त्यांचे स्थान अबाधित आहे. तसे पहिले तर इंग्लंडच्या राणीचा निवास लंडन मधील Buckingham Palace मध्ये असतो. मी लंडनला २०१० मध्ये गेलो होतो, तेव्हा ते पहिले होते, तेथील Queen’s Guard अनुभवले होते. पण आताचा विवाह सोहळा Windsor Castle मध्ये संपन्न होत होता. माझ्याकडे एक English Heritage Book of Castles नावाचे Tom McNeill चे एक पुस्तक आहे. जसे मराठीत सदाशिव शिवदे यांचे महाराष्ट्रातील वाडे यावर पुस्तक आहे तसे. किल्ले, वाडे, गढ्या हा तर माझा आवडीचा विषय. इंग्लंड, किंवा सर्व युरोपभर अशी गढी(castles) यांची मालिकाच विखुरलेली आहे. माझ्या लंडन भेटी दरम्यान इतर वाडे पाहता नाही आले. ह्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या ऐतिहासिक Windsor Castle आणि त्याच्या सुंदर, हिरव्यागार परिसराचे देखणे रूप दिसत होते.

CNN ने थेट प्रसारणाची उत्तम व्यवस्था केली होती. दोन-तीन ठिकाणी त्यांची मंडळी, आणि इतर तज्ञ मंडळी ठाण मांडून बसली होती. मला काही वेळ समजले नाही CNNला का एवढी पडली आहे. पण नंतर समजले. या राजपुत्राची नियोजित वधू अमेरिकन आहे ते. मग डोक्यात प्रकाश पडला. अमेरिका आणि ब्रिटन हे दोघे खरेतर आता मित्र देश, पण अमेरिकेचा इतिहास पाहता, त्यातून परत भारतासारखेच अमेरिकेची निर्मिती ब्रिटीश वसाहतवादापासून मुक्त होऊन झालेली. त्याची नांदी अमेरिकेत बोस्टन येथे बोस्टन टी पार्टीच्या निमित्ताने झाली, ज्याला मी नुकतेच भेट देऊन आलो होतो. दोन्ही देश एकमेकांच्या कुरापती, मस्कऱ्या काढत असतात. आता काय, अमेरिकी मुलगी इंग्लंडचा राजघराण्यात सून म्हणून जाणार होती. त्यामुळे चर्चेला उधाण आलेले.

राजपुत्राचे नाव हॅरी, आणि नियोजित वधूचे मेघन मर्कल. हा हॅरी प्रिन्सेस डायानाचा धाकटा मुलगा. तर मेघन ही एक हॉलीवूड अभिनेत्री. एका blind date मध्ये दोघांची ओळख झाली आणि पुढे वाढली. मेघन ही एक तर biracial, त्यातच आधीच्या लग्नापासून घटस्फोट, दोन मुले, अशी सर्व तिची पार्श्वभूमी. Biracial म्हणजे असे की तिची आई ही कृष्णवर्णीय(African black), तर पिता श्वेतवर्णीय(white). ही ह्या इंग्लंडच्या सनातन अश्या राजघराण्याची स्नुषा होणार. इंग्लंडची राणी आणि प्रिन्सेस डायाना यांच्यामधील वाद, मतभेद प्रसिद्ध आहेत. राजघराणे अजूनही परंपरावादी आहे असे सर्व जण मानतात, हे सर्व असताना ही मुलगी नववधू म्हणून येते. ती कशी काय पुढे राहते, संबंध कसे राहतात हे सर्व उत्सुकतचे नक्की आहे. असो. ह्या विवाहासाठी हजर राहणारे लोक म्हणजे दोन्ही देशातील VIP मंडळी. थेट प्रक्षेपणात ते सर्व दाखवत होते. आपल्या प्रियांका चोप्राने देखील हजेरी लावली होती(ती अमेरिकन मालिकांमध्ये काम करत असे). अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आलेल्या महिलांच्या डोक्यावर असलेली खास तयार केलेल्या विविध आकाराच्या, रंगांच्या टोप्या(hats, head gear). तश्या टोप्या परिधान करण्याची परंपरा आहे. राजपुत्र हॅरीला Duke of Sussex  हे तर मेघनला  Duchess of Sussex हे नामाभिधान देण्यात आले.

दुपारचे चार वाजत आले होते. कर्नाटकात येडूराप्पा यांनी विश्वासमत ठरावाच्या आधीच तडकाफडकी राजीनामा देऊन सगळी हवाच काढून घेतली. तर दूर इंग्लंड मध्ये लग्नघटिका जवळ येत होती. Windsor Castle समोर एक रस्ता आहे, ज्याला Long Walk असे नाव आहे, त्याच्या दुतर्फा हजारो लोक थांबले होते, जल्लोष करत होते. आधी दोन्ही राजपुत्र आले(हॅरी, आणि विलियम्स). हॅरीने काळा सैनिकी, सरदारी पोशाख परिधान केला होता. का कोणास ठाऊक हा हॅरी मला दाढी वाढवलेल्या भारतातील प्रिन्स सारखा दिसत होता, हसत होता. अहो, हा प्रिन्स म्हणजे आपला राहुल गांधी! तर नववधूने पांढरा शुभ्र wedding gown परिधान केला होता. तिच्या अंगावर एक दागिना नव्हता. आपल्याकडे असे शाही लग्न असते तर केवढे दागदागिने दिसले असते. Windsor Castle मध्ये असलेल्या चर्च मध्ये विवाहाचा विधी पार पडणार होता. राजपुत्र हॅरीच्या पित्यांनी म्हणजे राजपुत्र चार्ल्स यांनी नववधूचे स्वागत केले आणि तीला चर्च मध्ये नेले. इतर सगळे देखील तेथे जमा झाले. संगीत सुरु झाले होते. चर्च मधील पाद्रीने बायबल मधील वचने उद्धृत करून, ख्रिस्ती पद्धतीने विवाह झाला, एकमेकांच्या बोटात अंगठ्या सरकवल्या गेल्या, चुंबनविधी देखील पार पडला. त्या पाद्रीने विवाह म्हणजे काय, स्त्री पुरुष नाते, प्रेम, आदर या सर्व गोष्टी सांगितल्या. नंतर एका कृष्णवर्णीय पाद्रीनेदेखील उपदेश केला, तो थोडा विनोदी होता. त्याने अग्नी हा विषय घेऊन त्याचा शोध कसा क्रांतिकारक आहे हे सांगितले, त्याने दिलेल्या फेसबुक वगैरे उदाहरणावरून थोडी खसखस पिकली.

ते नवविवाहित जोडपे बाहेर येऊन समोर जमा झालेल्या जनसमुदायाला अभिवादन करून, घोडागाडीत बसून पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले. CNNचे निवेदक चर्चा करत होते, मुद्दे मांडत होते. असा हा शाही विवाह, जो होऊ घातलेल्या बदलांची नांदी ठरू शकेल असा. हे सर्व येणारा काळच ठरवेल.

(ता. क. मी अमेरिकेतील सिएटल शहरात जानेवारी २०२२ मध्ये असताना, तेथे असलेल्या Frye Art Museum ला भेट दिली होती. तेथे मला ह्या प्रिन्स हॅरी आणि मेघन मर्कल यांच्या विवाहाच्या सोहळ्यावर भाष्य करणारे, खिल्ली उडवणारे, असे विचित्र चित्र होते. ते चित्र इराणी चित्रकार Rokni Haerizadeh यांनी काढले आहे. ते मला या ब्लॉग वर टाकण्याचा मोह आवरला नाही. त्याची caption अशी होती: In this work on paper, Rokni Haerizadeh transforms an iconic British Royal wedding portrait of Prince Harry and Meghan Markle into an outlandish scene. By overpainting the original image with animal figures, distorted features, and other surreal details, the artist critiques mass consumption of such coded displays of soft power and points to the ugly truths they conceal.)

Leave a comment