सिनेमामय आठवडा, भाग#६

हा ब्लॉग माझ्या सिनेमामय आठवडा मालिकेतील सहाव्या भाग. Film Appreciation(रसास्वाद सिनेमाचा) शिबिराच्या अनुभवावर आधारित ही मालिका आहे. त्यातील आधीचे भाग येथे वाचायला मिळतील. आता महिना झाला शिबीर सुरु होऊन गेल्याला. ‘वास्तव रूपवाणी’ मासिकाची वार्षिक वर्गणी भरून झाली आणि प्रभात चित्र मंडळचे अभिजीत देशपांडे यांच्याशी बातचीत झाली. आम्हा शिबिरार्थीच्या WhatsApp गटात विविध चर्चा आणि माहिती, व्हिडियो फिरतायेत. फिल्ममेकिंगविषयीची, रसास्वादाविषयीची विविध पुस्तके( प्रभात चित्र मंडळच्या वेबसाईटवर ती दिली आहेत) डोळ्याखालून घालतोय, आणि ह्या अजून हा विषय डोक्यातून गेलाच नाहीये. मध्येच आल्फ्रेड हीचकॉकच्या दोन चित्रपटांबद्दल एक ब्लॉगदेखील लिहून झाला. असो. परत शिबिराच्या सहाव्या दिवसाच्या अनुभवकथानाकडे येतो.

आजचा दिवस हा जागतिक समकालीन सिनेमा हा विषय घेऊन बोलणाऱ्या पुण्याचेच अभिजीत रणदिवे यांनी सुरुवात केली. आपल्याकडे जागतिक सिनेमा म्हणजे अमेरिकेतील हॉलीवूडचे सिनेमा असा धरला जातो. पण जगात इतर भागात, जसे, मेक्सिको, जपान, रशिया, युरोप मध्ये, आणि आता इराण मध्ये देखील दखल घेण्याजोगे सिनेमे बनत आहेत, आणि अजूनही बनत आहेत. त्यांच्या विषयाचा गोषवारा असा होता की जागतिक समकालीन सिनेमाचे वैशिष्ट्य असे की जे काही सांगायचे आहे मांडायचे आहे, ते सरळ सरळ न सांगता, ढोबळपणे सांगणे, किंवा विविध प्रतिमांचा वापर करून सांगणे याकडे कल असतो. त्यांनी विविध चित्रफिती दाखवून हा मुद्दा स्पष्ट केला. चीनमध्ये Three Gorges  नावाचे जे भले मोठे धरण बांधले आहे, त्यामुळे निर्माण झालेले प्रश्न ह्या Still Life सिनेमात मांडले गेले आहेत. फ्रान्स मध्ये जे निर्वासितांचे प्रश्न आहेत, त्याबद्दल भाष्य करणारी, black comedy कडे थोडीशी झुकणारी एक चित्रफीत आम्ही पाहिली. Ameros Perros नावाची मेक्सिकन फिल्मची थोडीसी झलक देखील, जी dog fight या theme वर आधारित ३ वेगवेगळया गोष्टींची गुंफण आहे, ती पाहिली. एकूणच अश्या तऱ्हेने अभिजीत रणदिवे यांनी असे वेगळे चित्रपट पाहून जगात चित्रपट माध्यम हे, विवध प्रश्न मांडण्यासाठी, काहीतरी सांगण्यासाठी, कसे वेगवेगळया तऱ्हेने वापरले जाते हे स्पष्ट केले. 

नंतर गणेश मतकरी यांनी हिंदी सिनेमातील समांतर सिनेमाची जी चळवळ होती, त्याबद्दल, सुरुवात कशी झाली, सुवर्णकाळ, आणि नंतर कालौघात ती चळवळ कशी थंडावली, तिचे रुपांतर कशात झाले, याचे विवेचन केले. अर्थात हिंदी पाठोपाठ भारतातील इतर भाषांत देखील ही चळवळ सुरु झाली होती, पण त्यांनी तिचा विशेष आढावा घेतला नाही. पण भारतात एकूणच ही चळवळ बंगाली भाषेतील पाथेर पांचाली या सत्यजित राय यांच्या, आणि नंतरच्या दोन सिनेमांनी(अपूर संसार, अपराजीतो, Apu Trilogy) सुरुवात झाली. फ्रेंच New Wave Cinema ची लागण सत्यजित राय यांना झाली, आणि ही नवीन विचारधारा भारतातील चित्रपटांतून दिसू लागली. या विचार धारेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे वास्तववाद, समाजातील प्रखर वास्तवाचे दर्शन. ह्याला समांतर सिनेमा म्हणजे parallel cinema किंवा art film असे म्हणतात. हिंदी मध्ये मग भीष्म सहानी यांचे सिनेमे, आणि श्याम बेनेगल, मणी कौल यांनी केले सिनेमे हे सर्व याच पठडीतील होते. बंगाली व्यतिरिक्त ही चळवळ इतर भाषांतून देखील पसरली, जसे कन्नड(गिरीश कासारवल्ली, मल्याळम्(अदूर गोपालकृष्णन). खूप पूर्वी दूरदर्शनवर रविवारी रात्री असे प्रादेशिक सिनेमे दाखवत असत(अजूनही असतात). मला आठवते, १९९० च्या आसपास, असाच एके रात्री, कन्नड चित्रपट काडीना बेन्की(ಕಾಡಿನ ಬೆಂಕಿ) हा अतिशय वेगळा तऱ्हेचा सिनेमा पहिला होता(सुरेश हेबळीकर दिग्दर्शक, गिरीश कर्नाड यांची देखील भूमिका होती, आणि विषय तसा बोल्डच होता), स्पंदन नावाचा असाच एक कन्नड चित्रपट देखील पहिला होता. असो, तर ही चळवळ हिंदी मध्ये खुपच वर्षे सुरु होती. चक्र, आक्रोश, अंकुर, निशांत, मंथन, आणि इतर बरेच सिनेमे याच काळातील. पेस्तोनजी नावाचा पारसी समाजावर भाष्य करणारा सिनेमा, विजया मेहता यांनी केला होता(त्या बद्दल येथे लिहिले होते). असा सुवर्ण काळ पाहिल्यानंतर, रंगीत दूरचित्रवाणी, व्हिडियो प्लेअर, यामुळे थोडी थंडावली, आणि तिने हळूहळू असे प्रयोग मुख्यप्रवाहातील सिनेमातच येऊ लागले. वेगवेगळया media company कडून चित्रपट क्षेत्रात गुंतवणूक आली, आणि जो काही गंगाजळी शिल्लक राहायला लागली ती अश्या कलात्मक, प्रायोगिक चित्रपट बनवण्यासाठी वापरू जाऊ लागला. त्यामुळे असे सिनेमे आजच येत्तात, आणि वेगवेगळया genre मध्ये काम करू पाहतात.

दुपारच्या भोजनानंतर परत गणेश मतकरी यांचेच सत्र होते, जिचा विषय हा श्वास चित्रपटानंतरचा मराठी चित्रपट, त्याची वाटचाल याबद्दल. त्यांनी उलगडलेला प्रवास बऱ्यापैकी माहितीचा होता. त्यामुळे विशेष काही हाती लागले नाही. तमाशापट, विनोदी चित्रपट, आणि कौटुंबिक चित्रपट ह्या लाटेतून श्वास चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीला जरा बाहेर काढले. नवीन दमाचे दिग्दर्शक, नवीन आणि वेगळ्या जगाची ओळख ज्यांना झाली आहे असे ते, दळणवळण क्रांती, यामुळे ह्या पिढीला वेगवेगळया वाटा शोधण्यास वाटू लागले, आणि चित्रपट बदलू लागला.

image

समर नखाते

त्यानंतरचे व्याख्यान होते ते FTII  मधील प्रसिद्ध प्राध्यापक समर नखाते यांचे. त्यांचे व्याख्यान हे सर्वाना अगदी मुळापासून उखडून टाकणारे होते. त्यांनी अर्थातच film theory थोडा भर दिला. चित्रचौकट म्हणजे काय, काळ आणि अवकाश यांची चित्रपट कशी सांगड घालतो, शॉट(shot) हे चित्रपटाचे एकक(unit) आहे, अनेक शॉट्स मिळून दृश्य(scene) कसे बनते, दृश्यमालिका म्हणजे चित्रपट असे सांगून थोडा आमची शाळाच घेतली. संकालनाची(editing) किमया त्यांनी उदाहरणाद्वारे दाखवून दिली. संकलनातील Dissolve is smoother than transition वगैरे तात्विक गोष्टी सांगितल्या. Gaze Theory आणि Apparatus Theory सारखे सिनेमाकडे पाहण्याचा, मांडणीचा, कलात्मक दृष्टीकोन कसा असू शकतो, अश्या तात्विक वादांची जाणीव करून दिली. फिल्म हे माध्यम, त्याचे तत्वज्ञान, तात्विक बाजू काय आहे ह्याची झलक झाली.

दिवसाचा शेवट हा दोन सिनेमे दाखवून होणार होता. पहिला होता ‘ती आणि इतर’ हा मराठी चित्रपट. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि भारतीय सिनेमातील समांतर चळवळीतील एक प्रमुख नाव, गोविंद निहलानी यांनी दिग्दर्शित केलेला. हा अगदी तसा नवीनच चित्रपट. तो मी पूर्ण पहिला. एका सुखवस्तू, उच्च माध्यमवर्गीय कुटुंबाची कहाणी. बाहेरच्या जगातील घडामोडींकडे पाहण्याच्या, निष्क्रीय मानसिकतेचा पुरस्कार करणाऱ्या समाजाचे दर्शन त्यात घडते. एका घरातच प्रामुख्याने चित्रपट साकारला जातो, त्यामुळे की काय मला तो नाटकासारखा वाटला. दुसरा सिनेमा होता चिदंबरम्‌ नावाचा १९८६ मधील मल्याळम सिनेमा. त्यातील आकर्षण होते ते प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील हिची भूमिका. तिने मल्याळम सिनेमात काम केल्याचे मला माहिती नव्हते. मी थोडावेळ पहिला आणि निघून गेलो. अतिशय संथ कथा होती, केरळचे सृष्टीसौंदर्य अगदी बहारीने चित्रीत केलेले दिसत होते. स्मिता पाटील तर सुंदर दिसत होतीच, अगदी केरळी स्त्री वाटत होती, पण मी असे पर्यंत तिच्या तोंडी एकाही वाक्य नव्हते. मग कंटाळलो.

असो. तर हा असा होता शिबिराचा सहावा दिवस. पुढील ब्लॉग मध्ये, शिबिराचा सातवा आणि शेवटल्या दिवसाबद्दल. जरूर प्रतिक्रिया कळवा!