सिनेमामय आठवडा, भाग#५

हा ब्लॉग माझ्या सिनेमामय आठवडा मालिकेतील पाचवा भाग. Film Appreciation(रसास्वाद सिनेमाचा) शिबिराच्या अनुभवावर आधारित ही मालिका आहे. त्यातील आधीचे भाग येथे वाचायला मिळतील. शिबिराचे एका मागून एक दिवस जात आहेत. चित्रपटांचे वेगळे जग, त्याचा इतिहास, त्यात लोकांनी केलेले काम, हे सगळे हळू हळू समजते आहे. चित्रपटक्षेत्राकडे पहाण्याचा माझा दृष्टीकोन किती संकुचित होता हे जाणवू लागले आहे. वरवर दिसणाऱ्या झगमगटापलीकडील, त्यातील कला, त्याची म्हणून काही जी मूलतत्वे आहेत ह्याची परत नव्याने ओळख होत आहे. आज परत नाश्त्याच्या वेळेला आणखीन काही जणांची ओळख झाली. आधीच्या ब्लॉग मध्ये म्हटल्याप्रमाणे, मुंबईवरून एक मोठा गट या शिबिरासाठी आला होता. लोकप्रभाचे संपादक विनायक परब पण त्यात होते. त्या गटातील शिबिरार्थीबरोबर गप्पा मारता मारता समजले की प्रशांत जोशी म्हणून एक गृहस्थ होते, ते नाट्यक्षेत्राशी संबंधित होते, प्रकाशयोजनाकार म्हणून काम करतात. मुंबईच्या पृथ्वी थिएटर, अविष्कार इत्यादी संस्थेबरोबर ते निगडीत होते. त्यांनी पृथ्वी थिएटर माजी सर्वेसर्वा शशीकूपर बरोबरच्या काही आठवणी सांगितल्या.

आजच्या पहिल्या सत्राची उत्सुकता होती. प्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुलकर्णी हा सकाळी येणार होता. आत जाऊन विसावलो तितक्याच असे जाहीर करण्यात आली की उमेश कुलकर्णी उशिरा येणार आहेत. त्यामुळे तोपर्यंत त्याने बनवलेला एक लघुपट(त्याची diploma film) दाखवण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. आम्हाला दाखवण्यात आलेला लघुपट होता ‘गारुड'(The Spell). त्याला कथा अशी नाही. फक्त कॅमेरा एका खोलीतून दुसऱ्या खोलीत सरळ जात राहतो. संवाद नाहीत. पार्श्वसंगीत ऐकू येत राहते. जवळ जवळ मूकपटच. कुठेतरी वाचले होते की संवाद रहित मूकपटात दृश्यमाध्यमाच्या शक्यता जास्त  वापरल्या जातात, त्याचाच प्रत्यय आला. ह्या लघुपटाची रचना अतिशय विशिष्ट्यपूर्ण होती. आणि योगायोगाने उमेशच्या व्याख्यानाचा विषयच होता लघुपटाची रचना. तो आल्यावर त्याने थोडेसे स्वतः बद्दल सांगून, मग लघुपटाचे महत्व, त्याची बलस्थाने इत्यादी बद्दल बोलला. नंतर कला म्हणजे काय यावरच त्याने थेट हात घातला, कलेचे प्रमुख उदिष्ट काय असावे आणि त्या अनुषंगाने चित्रपट माध्यम कसे कला म्हणून पुढे येते यावर चर्चा त्याने केली. गिरणी हा त्याचा आणखीन एक लघुपट देखील दाखवला आम्हाला गेला, आणि त्यानंतर त्यावर चर्चा झाली. ह्या लघुपटात त्याने घरामध्ये लघुउद्योगासाठी घरघुती गिरणी आल्यावर, घरातील मुलाच्या भावविश्वात काय होते, याचे चित्रण येते. आधीच्या गारुड वर देखील थोडीशी चर्चा झाली असती तर चांगले झाले असते. उमेश कुलकर्णी याने लघुपटांचे महत्व अधोरेखित केले, तसेच लघुपटाकडे चित्रपट क्षेत्रात पदार्पण करण्याचे पहिले पूल म्हणून पाहू नये, असे त्याचे म्हणणे होते.

उमेशच्या नंतर मुंबईहून आलेले अभिजीत देशपांडे यांचे फिल्म सोसायटी बद्दल व्याख्यान झाले. त्याचा इतिहास, वाटचाल, भारतातील त्याचे कार्य, महत्व, चित्रपट साक्षरता निर्माण करण्यात असलेला मोलाचा वाटा, इत्यादी बद्दल सांगितले. चित्रपटची म्हणून एक स्वतःची भाषा असते, आणि ती गणित आणि संगीत याप्रमणे वैश्विक असते, हे त्यांनी नमूद केले. Edmond Benoit Levy याने जगातील पहिला फिल्म क्लब १९०७ मध्ये फ्रान्स मध्ये सुरु केला.  सत्यजित राय, मेरी सेटन(Marie Seton) यांचे फिल्म सोसायटी स्थापन करून दिलेले योगदान त्यांनी श्रोत्यांसमोर मांडले. केरळ मध्ये अदूर गोपालकृष्णन यांनी १९६० मध्ये केरळ मधील पाहिली फिल्म सोसायटी स्थापन आणि ती चळवळ इतकी वाढली, की आजमितीला केरळ मध्ये सर्वात जास्त म्हणजे ११८ फिल्म सोसायटी चालू आहेत. पुण्यातही आशय फिल्म क्लब आहे, चा देखील फिल्म क्लब आहे. त्यात जायला हवे असे मनात नोंदवले. उमेश कुलकर्णी याने देखील लघुपटांसाठी म्हणून अरभाट फिल्म क्लब सुरु केला आहे. तोही बराच प्रसिद्ध आहे.

दुपारी भोजनानंतर जरा पाय मोकळे करावे म्हणून बाहेर दूरदर्शन केंद्रापर्यंत गेलो. गेली ३-४ चार दिवस, भोजनानंतर, NFAI च्या परिसरात फेरफटका मारण्याचा मी शिरस्ता पाडून घेतला होता. आधी सांगितल्याप्रमाणे हा परिसर अतिशय रम्य आणि हिरवागार आहे.

दुपारचे पहिले सत्र हे निखिलेश चित्रे यांचे साहित्य आणि चित्रपट यावर होता. ते खुपच रंगले. काही वाद झडले. त्यांनी सुरुवातच अल्बर्ट कामू याच्या प्रसिद्ध अश्या The Castle या कादंबरीवरून तयार केलेले तीन चित्रपट याबद्दल बोलून केली. त्या तिन्ही चित्रपटातील सुरुवातीची ५ मिनिटे कशी चित्रित केली गेली, आणि प्रत्येकात काय फरक होता, का फरक झाला, याबद्दल चर्चा झाली. सिनेमातत्व आणि साहित्यतत्व ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, आणि एकमेकांची तुलना करू नये असा सर्वसाधारण सूर होता.सिनेमा हे कालबद्ध माध्यम आहे, तसेच ते समजण्यापेक्षा जाणवण्याचे माध्यम अधिक आहे, आणि साहित्य वाचून आलेली अनुभवांचे माध्यमांतर चित्रपटात होत असते हे लक्षात आणून दिले.

नंतर दोन लघुपट आम्ही पहिले. पहिला होता तो प्रत्येक चित्रपट रसास्वाद शिबिरातून दाखवला जाणारा प्रसिद्ध असा लघुपट Big City Blues हा दाखवण्यात आला. त्याची फिल्म आता जगात कुठेच नाही असे सुषमा दातार यांनी सांगितले. नावावरून मला वाटले की मोठ्या शहरातून राहण्याचे काय त्रासदायक अनुभव असतात त्यावर असेल. पण येथे Blues चा अर्थ संगीत प्रकाराशी निगडीत आहे. १९६२ मधील मूकपट आहे, पण पार्श्वसंगीत आहे, आणि ते अर्थात jazz/blues आहे. वीस मिनिटात आपल्याला व्यक्तींच्या विविध छटा दाखवून देतो. तो दाखवून झाल्यानंतर त्यावर बरीच चर्चा रंगली. दुसरा लघुपट होता, तो वर उल्लेख केलेल्या प्रशांत जोशी यांनी त्यांनी स्वतः बनवलेल्या अवयवदानाचे महत्व सांगणारा ‘देणं” हा लघुपट दाखवला. तो एका महत्वाच्या विषयावरील नक्कीच चांगला प्रयत्न होता.

आणि दिवसाच्या शेवटी हा Separation हा २०११ मधील इराणी प्रसिद्ध सिनेमा दाखवण्यात आला. ह्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ह्याचा दिग्दर्शक असघर फरहादी आहे. अतिशय नाट्यमय चित्रपट आहे. पती-पत्नी मधील ताण तणाव, कोर्टातील वाद, त्यांच्या किशोरवयीन मुलीची आगतिकता यांचे सुरेख चित्रण त्यात आहे. मला तरी तो चित्रपट अस्सल भारतीयच वाटला. हा दुसरा इराणी चित्रपट होता. एकूणच इराणी चित्रपटांचे आजकाल एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे असे वाटते आहे.

Leave a comment